सबबी, जिम आणि थेरपी
- The Secret Ingredient Mental Health
- Jan 14
- 3 min read
तुम्हाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करते.
ब्लॉगची तारीख तुम्ही पुन्हा एकदा तपासलीत? बरोबरच आहे, नवीन वर्ष होऊन बराच काळ झाला आहे, आणि हा ब्लॉग तर, तुम्ही ओळखलंतच, ख्रिसमसच्या आधीच लाईव्ह व्हायला हवा होता!हम्म… पुढे ढकलण्याबद्दल ब्लॉग लिहितानाच तो पुढे ढकलला का मी? कदाचित. कदाचित नाही.मला आठवतं, एकदा जिममध्ये गेले होते तेव्हा तिथे एक मोठा पांढरा बोर्ड होता. त्यावर लोकांना विचारलं होतं- “तुम्ही जिमला का आला नाहीत?” आणि उत्तरं अगदी तुमच्या-माझ्या सारखीच होती. “वेळेत उठले नाही.” “जिम खूप जवळ आहे/खूप लांब आहे.” “वेळेत मेंबरशिप रिन्यू केली नाही.” “आज मन नव्हतं.” “आधी माझ्या खर्चाकडे पाहते.” “मला जमेल की नाही माहित नाही.” “तिथे मला परकं वाटेल असं वाटलं.” अशी अनेक कारणं.
जरा विचार केला तेव्हा जाणवलं- थेरपी सुरू करण्याबाबत मीही स्वतःला अगदी अशीच, वरवर निरुपद्रवी वाटणारी कारणं देत होते.
माझ्या ओळखीच्या वर्तुळात नसलेला मानसशास्त्रज्ञ मिळेल का, खर्च कसा जमेल, आधीच भरलेल्या दिवसातून थेरपीसाठी एक तास कसा काढायचा, थेरपीमध्ये नेमकं बोलायचं तरी काय - या सगळ्या प्रश्नांमध्ये मी बराच काळ थेरपी सुरू करणं आणि पुढे ढकलणं यात तळ्यात मळ्यात करत राहिले. वरवर पाहता सगळी कारणं योग्यच वाटत होती. वेळ मर्यादित असतो. पैसा महत्त्वाचा असतो. नवीन जागी स्वतःला थोडं विसंगत वाटणं अस्वस्थ करतं.पण या सगळ्यांच्या आत कुठेतरी एक वेगळीच गोष्ट शांतपणे काम करत होती-व्यवहार्यतेच्या नावाखाली लपलेलं टाळणं.
जिमच्या बाबतीत हे टाळणं पटकन दिसून येतं. आपण त्यावर हसतो, कधी कधी त्याचा अभिमानही बाळगतो. पण थेरपीच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. कारण इथे फक्त शरीराने उपस्थित राहायचं नसतं; मनानेही हजर राहायचं असतं. स्वतःला व्यक्त होऊ द्यायचं असते. आपल्या त्या भावना आणि विचारांसोबत बसायचं असतं, जे आपण कायम कामात, उत्पादकतेत, किंवा “नंतर बघू” असं म्हणत बाजूला ठेवलेले असतात.
माझ्या हळूहळू लक्षात आले की दिरंगाई करण्याचे कारण हे आळस किंवा अयोग्य नियोजन नव्हते. त्या मागे भीती देखील होती; असुरक्षिततेची भीती, ज्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी मी कदाचित तयार नसेन त्या गोष्टी उघड होण्याची भीती, आणि बदलाची भीती. कारण एकदा थेरपी सुरू केली की, “अज्ञानात सुख” असं म्हणणं कठीण होतं. एक दार उघडतं, आणि आत कुठेतरी हे जाणवतं की आयुष्य आता अगदी पूर्वीसारखं राहणार नाही.
मी थेरपीला महत्त्व देत नव्हते म्हणून तिला टाळत नव्हते. मी तिला टाळत होते, कारण ती माझ्यासाठी महत्त्वाची होती!!! कारण त्यासाठी सातत्य, प्रामाणिकपणा आणि एक प्रकारचा धीमेपणा आवश्यक होता, जो मी स्वतःला द्यायला सरावलेली नव्हते.
आणि तरीही, ज्या गोष्टीने मला शेवटी पुढे जाण्यास प्रवृत्त केले, ती कोणतीही अचानक आलेली प्रेरणा किंवा माझ्या वेळापत्रकात मिळालेली योग्य संधी नव्हती. ती एक शांत जाणीव होती -“रेडी” वाटेपर्यंत थांबणं हाही स्वतःची काळजी पुढे ढकलण्याचाच एक प्रकार आहे. मला पूर्ण खात्री, धैर्य किंवा स्पष्टता लागणार नाही. फक्त अपूर्णपणे सुरुवात करण्याची तयारी पुरेशी आहे. आणि तिथूनच मी थेरपी सुरू केली.

आता असं जाणवतं की, कामात दिरंगाई करणे हे क्वचितच वेळेबद्दल असते. ते अनेकदा कोमलतेबद्दल असते. आपल्यातील त्या भागांबद्दल असते, जे शिस्तीची नव्हे, तर सौम्य वागणुकीची अपेक्षा करत असतात. आणि कधीकधी, आपण करू शकणारी सर्वात मूलगामी गोष्ट म्हणजे आपल्या भीतींशी वाटाघाटी करणे थांबवणे आणि फक्त हे म्हणणे: आताही, मला आधाराची गरज आहे.
म्हणूनच, जर तुम्ही काही महत्त्वाचं पुढे ढकलत असाल- थेरपी, जिम, विश्रांती, सर्जनशीलता, बदल.... तर हा लेख तुमच्यासाठी एक हलकासा इशारा समजा. घाई करण्यासाठी नाही. स्वतःला दोष देण्यासाठी नाही. फक्त थांबून लक्ष देण्यासाठी. आणि शक्य असेल तर, अगदी छोटं का असेना, पण एक पाऊल पुढे टाकण्यासाठी.
शेवटी काय, हा ब्लॉग तरी लिहिला गेला ना. थोडा उशिरा, पण तेवढंच सध्या पुरेसं आहे 🙂
लेखिका
इषा कुलकर्णी ही पुण्यातील कावेरी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये मानसशास्त्र विषयात पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. वाणिज्य शाखेची पदवी आणि CA IPCC पूर्ण केल्यानंतर तिने फायनान्समधून मानसशास्त्राकडे वळण्याचा निर्णय घेतला, कारण आकड्यांपेक्षा मानवी मन तिला अधिक आकर्षक वाटतं. सध्या ती The Secret Ingredient येथे ऑपरेशन्स कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे, जिथे तिचं पूर्वीचं शिक्षण, सध्याचे अभ्यासविषय आणि आवडी एकत्र येतात.
