दुःख आणि त्याच्यासोबत येणारी बंधनं
- The Secret Ingredient Mental Health
- Dec 30, 2025
- 1 min read
सामान्यतः असं म्हटलं जातं की दुःख वैयक्तिक असतं.पण प्रत्यक्षात तसं फारसं घडत नाही.
मृत्यू आयुष्यात कधी हळूच, तर कधी धक्क्यासारखा येतो. तो आपल्या नेहमीच्या आयुष्याची लय विस्कटून टाकतो आणि अशी एक वेदना मागे ठेवतो, जी शब्दात सांगणं अवघड होत. आणि तरीही, अगदी सुरुवातीलाच दुःखाकडे खूप निरीक्षणाने पाहिलं जाऊ लागतं, त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात, आणि इतरांच्या अपेक्षांनुसार त्याला अर्थ दिला जातो. दुःख कसं दिसायला हवं, कसं व्यक्त व्हायला हवं, आणि शरीरात कसं जाणवायला हवं याची जणू एक न सांगितलेली चौकट असते.
मी ज्या सामाजिक आणि कौटुंबिक संदर्भात वाढले, तिथे मृत्यूमुळे येणारा शोक फक्त त्या व्यक्तीपुरता राहत नाही. तो कुटुंबाचा होतो, समाजाचा होतो, शेजारपाजारचा होतो…. यात काळजी आहे, यात शंका नाही. यात परंपरा आहे, संस्कृती आहे, आणि अनेक पिढ्यांचा अनुभव आहे. पण त्याचबरोबर दबावही आहे आणि बंधनंही आहेत.
मृत्यूमुळे येणारी अस्वस्थता सहन करणं अनेकांना अवघड जातं.
शोकासोबत शांतपणे बसणं म्हणजे अनिश्चिततेसोबत बसणं, असहायतेसोबत बसणं, आणि आपल्या आयुष्याच्या मर्यादांची जाणीव होणं. म्हणून आपण थांबत नाही. आपण काहीतरी करतो!! सल्ले देतो, सतत चौकशी करत राहतो. शांतता अस्वस्थ करते म्हणून आपण ती भरून काढतो. अनेक घरांमध्ये शोक लगेचच लोकांनी वेढला जातो. कुणीतरी नेहमी फोन करत असतं. कुणीतरी घरी येत असतं. “कसं सावरताय?” “तुम्ही स्ट्राँग आहात ना?” असे संदेश येत राहतात. आणि मग सल्ले सुरू होतात. काय खायचं. काय करू नये. किती रडायचं. केव्हा थांबायचं. पुन्हा रोजचं आयुष्य कधी सुरू करायचं.
मला समजतं की हे सगळं काळजीपोटीच असतं. पण कधी कधी असं वाटतं की यामागे दुःख जसं खरं असतं तसं ते पाहता न येण्याची अस्वस्थताही असते. अस्ताव्यस्त असलेलं दुःख…. ठराविक चौकटीत न बसणारं दुःख…. ओळखीच्या पद्धतीने एक्सप्रेस न होणारं दुःख…. दुःखी दिसण्याची अपेक्षा असते. उघडपणे रडण्याची अपेक्षा असते. शोक व्यक्त व्हायलाच हवा!! जणू त्याचं सादरीकरण व्हायलाच हवं असा एक दबाव असतो. जेणेकरून इतरांना खात्री वाटेल की मृत्यू मान्य केला गेला आहे, दुःख “योग्य पद्धतीने” अनुभवलं जात आहे. कमी रडल्यास चिंता, जास्त रडल्यास दुरुस्ती! एकांत हवा असेल तर तो अयोग्य मानला जातो. पुन्हा पूर्वीसारखं वाटायला लागणं लवकर झालं, तर त्याला नाकारलं जातं.

दुःख दिसायलाच हवं असा आग्रह धरण्यात एक सूक्ष्म हिंसा आहे. समोरच्याने आपली वेदना दाखवावी, जेणेकरून इतरांना बरं वाटेल. यामुळे आधीच शोक वाहणाऱ्या व्यक्तीवर इतरांच्या अस्वस्थतेची जबाबदारी येते. मृत्यूशी संबंधित पारंपरिक पद्धती लोकांना धरून ठेवण्यासाठी होत्या. सामूहिक शोक, विधी, आठवणी शेअर करणं यामागे एक खोल अर्थ होता. त्या म्हणत होत्या: या मृत्यूमध्ये तुम्ही एकटे नाही. पण कधी कधी या पद्धती कठोरही होतात. आधार देणाऱ्या गोष्टी हळूहळू दिशा देऊ लागतात. शोकासोबत चालण्याऐवजी तो कसा असावा हे ठरवू लागतात. आपण सल्ला न देता, काही दुरुस्त न करता, सतत उपस्थित न राहता ही अस्वस्थता सहन करू शकतो का? समोरचा ज्या पद्धतीने शोक अनुभवतो, त्याला आपल्या हस्तक्षेपाची गरज नाही यावर विश्वास ठेवू शकतो का?
शोक शांतही असू शकतो. तो आतमध्ये साठलेला असू शकतो. तो खाजगीही असू शकतो. एखाद्याला इतरांसमोर रडायचं नसेल तर? एखाद्याला कामात गुंतायचं असेल, काही निर्माण करायचं असेल, किंवा शोकासोबत काही क्षण हलकेपणाचेही अनुभवायचे असतील तर? यामुळे त्या व्यक्तीचा शोक कमी खरा ठरतो का?
समाजाचा आधार म्हणजे सतत उपलब्ध असणं असं नाही. काळजी म्हणजे सुधारणा असायलाच हवी असं नाही. प्रेम म्हणजे सतत लक्ष ठेवणं असायलाच हवं असं नाही.
शोक आपल्याकडून प्रामाणिकपणा मागतो. मृत्यूबद्दलची आपली स्वतःची अस्वस्थता ओळखायला सांगतो. मदत करण्याची आपली गरज कधी स्वतःला शांत करण्याची गरज असते हे पाहायला सांगतो. आणि वेगळेपणासाठी जागा तयार करायला सांगतो.
शोक अनुभवण्याची एकच योग्य पद्धत नाही. कधीच नव्हती.
कदाचित सर्वात करुणामय गोष्ट म्हणजे परवानगी देणं. मोठ्याने किंवा शांतपणे शोक व्यक्त करण्याची परवानगी. पारंपरिक किंवा वेगळ्या पद्धतीने दुःख अनुभवण्याची परवानगी. लोकांसोबत किंवा एकट्याने शोक जगण्याची परवानगी. दुःख सादर न करण्याची परवानगी. इतरांना पूर्णपणे न समजेल अशा पद्धतीने मृत्यूशी संबंधित शोक अनुभवण्याची परवानगी.
लेखकाबद्दल
मुग्धा शिवापुरकरला लोक कसे जगतात, काय अनुभवतात आणि ज्या जगातून ते येतात त्यात अर्थ कसा शोधतात याबद्दल कुतूहल आहे. मानसशास्त्रज्ञ आणि आर्ट सायकोथेरपिस्ट म्हणून प्रशिक्षित असलेली मुग्धा, नातेसंबंध आणि संस्कृती यांमुळे अंतर्गत आयुष्य कसं घडतं यामध्ये रस घेते. हा लेख वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षणातून उमटलेला तिचा लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.

Comments